नवी दिल्ली : जगभरात मानसिक आजारांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचे मोठे कारण आता समोर आले असून हवामान बदलामुळे तथा उष्णतेच्या दाहकतेमुळे मानसिक आजार वाढल्याचे प्रसिध्द नियतकालिक लान्सेटने म्हटले आहे.
हवामान बदलामुळे अवघ्या जगालाच उष्णतेचा दाह सहन करावा लागत असून याचा नकारात्मक परिणाम मानवाच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. अल्झायमर आणि अर्धशिशीसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘लान्सेट न्यूरॉलॉजी जर्नल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हवामान चक्रात बदल झाल्याने दिवसभरातील तापमानामध्ये मोठी चढउतार होताना दिसून येते. यामुळे मेंदूच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडन’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरॉलॉजी(ब्रिटन)मधील संशोधक संजय सिसोदिया यांनी सांगितले. या सगळ्यामध्ये रात्रीचे तापमान हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो.
एखाद्या व्यक्तीचा झोपेचा अवधी कमी झाला तर त्याचे विपरीत परिणाम मेंदूवर होतात. अभ्यासकांनी १९६३ ते २०२३ या कालखंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या ३३२ शोधनिबंधांच्या निष्कर्षांचा आढावा घेतला होता. यासाठी मज्जासंस्थेच्या १९ विविध व्यवस्थांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला होता. मेंदूचा पक्षाघात, अपस्मार, अल्झायमर, मेंदूज्वर, तीव्र डोकेदुखी, मेंदूला रक्तप्रवाह करणा-या धमन्या आक्रसणे आदी आजारांची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते.
मेंदूच्या पक्षाघाताचे प्रमाण वाढले
रात्रीचे तापमान वाढल्याने मेंदूच्या पक्षाघाताचा झटका येऊन मरण पावणा-यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. स्मृतीभ्रंशाचा आजार असणा-या रुग्णांवर तापमानवाढीचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. महापूर, वणवे यासारख्या तीव्र नैसर्गिक बदलांच्या घटनांमुळे हे बदल स्वीकारण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. नैराश्य, अतिकाळजी आणि स्किझोफ्रेनियासारख्या आजाराशी हवामान बदलाचा कशा पद्धतीने संबंध आहे याचा संशोधकांनी बारकाईने अभ्यास केल्याचे दिसून येते. ते आता अभ्यासावे लागेल.
मानवी आजारांचे स्वरुप बदलणार?
हवामान बदलाची व्याप्ती लक्षात घेता त्याच्या केवळ समकालीन परिणामांचा अभ्यास करून भागणार नाही तर भविष्यामध्ये त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा देखील काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल. भविष्यातील मानवी आजारांचे स्वरूप हे नेमके कोणत्या प्रकारचे असेल याचा आताच वेध घ्यावा लागेल असेही सिसोदिया यांनी नमूद केले.