कॉंग्रेस नेत्यांचे ठिय्या आंदोलन
भोपाळ : वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह देशातही राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासून ते अर्जांच्या पडताळणीपर्यंत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसकडून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. दरम्यान, गांधी परिवाराजवळच्या मानल्या जाणा-या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनी यासंबंधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असून, तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मीनाक्षी नटराजन यांनी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी मध्य प्रदेशातून हा अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या अर्जावर भाजपाने आक्षेप घेतला होता. नटराजन यांनी आपल्या अर्जात त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारींची माहिती आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा आरोप भाजपाने केला होता. हाच आक्षेप ग्रा धरून नटराजन यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
हैदराबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात नगरसेविका ए श्रीलता यांनी मीनाश्री नटराजन यांच्याविरोधात एक याचिका दाखल केलेली आहे. शिवकुमार रेड्डी नावाच्या व्यक्तीने माझी छेड काढली, त्या व्यक्तीला नटराजन यांनी संरक्षण दिल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. याबाबबत मीनाक्षी नटराजन यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. याच प्रकरणाची माहिती नटराजन यांनी आपल्या अर्जात दिली नव्हती. भाजपाने यावरच आक्षेप घेतला. त्यावरून हा अर्ज फेटाळण्यात आला. याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला.
















