लातूर : प्रतिनिधी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा राबविली जात आहे. या अभियानांतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या सर्वेक्षणात लातूर विभागातील चार बसस्थानकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मुरुड बसस्थानकाने ८८ गुणांसह अ गटात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २३ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविले जात आहे. या अभियानातील पहिले सर्वेक्षण जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान झाले. यात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक स्तरावर लातूर विभागातील अ, ब आणि क गटातील एकूण चार बसस्थानके पहिल्या सर्वेक्षणात आघाडीवर राहिली आहेत. औसा नवीन बसस्थानकाने १०० पैकी ९४ गुण मिळवून अ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुरुड बसस्थानकाने ८८ गुणांसह अ गटात तृतीय क्रमांक मिळवला आहे. लातूर बसस्थानक क्र. २ (जुना रेणापूर नाका) याने ब गटात १०० पैकी ९२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे, तर क गटात लामजना बसस्थानकाने १०० पैकी ८३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
ज्या बसस्थानकांवर दैनंदिन बसफे-यांची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, त्यांचा समावेश अ वर्गात, २५१ ते ५०० बसफे-या असलेल्या बसस्थानकांचा समावेश ब वर्गात आणि २५० पेक्षा कमी बसफे-या असलेल्या बसस्थानकांचा समावेश क वर्गात करण्यात आला आहे. अभियानाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अंतिम स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या बसस्थानकांना रोख बक्षीस दिले जाईल. तसेच, राज्यस्तरावर प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या बसस्थानकास रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल. पहिल्या सर्वेक्षणात यशस्वी ठरलेली लातूर जिल्ह्यातील सर्व बसस्थानके अंतिम फेरीसाठी पारितोषिकास पात्र ठरू शकतात. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी पुढील सर्वेक्षणांसाठी उत्कृष्ट तयारी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी केले आहे.