मुंबई : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचत असल्याची टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर गत काही महिन्यांपासून सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर निशाणा साधत आहेत. त्यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींच्या इटली दौ-यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी भारत- अमेरिकेतील व्यापार करारावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मोदींवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, मोदी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या तालावर नाचत आहेत. मोदी यांनी भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांना प्रवेश देण्यास संमती दिली आहे. त्याचे भारतीय शेतीवर आणि लक्षावधी शेतक-यांच्या उपजीविकेवर दूरगामी व विनाशकारी परिणाम होणार आहेत.
आपले शेतकरी आधीच वाढता उत्पादन खर्च, किमान आधारभूत किमतीचा अपुरा मोबदला आणि घटलेली निर्यात या समस्यांशी झुंज देत आहेत. या स्थितीत ते प्रचंड अनुदान मिळणा-या अमेरिकन कृषी उद्योगाशी स्पर्धा करतील हे वाटत नाही. महाराष्ट्रात, गेल्या एका दशकात कर्जबाजारीपणा, दुष्काळ, वाढता खर्च आणि अनिश्चितता यामुळे ३७,००० हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. अगदी अलीकडेच, इंधन संकटाने राज्यातील शेतक-यांना हतबल करून सोडले आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची मशागतीची अत्यंत महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत.
कांदा उत्पादक शेतक-यांना त्यांच्या मालासाठी केवळ ५० पैसे प्रति किलोचा भाव दिला जात आहे. यामुळे ते एका पद्धतशीर कर्जचक्रात अडकले आहेत. कारण कांद्याचा उत्पादन खर्च मात्र किमान २२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. अशा गंभीर कृषी संकटाच्या काळातही, मोदी यांनी भारतीय शेतक-यांचा बळी दिला आहे! स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिशांनी शेतक-यांना गुलाम बनवले होते. आज मात्र, मोदी यांनी शेतक-यांचे भविष्य अमेरिकेच्या हाती विकून टाकले आहे. मोदी यांची निष्ठा संशयास्पद बनली आहे. आपले राष्ट्र पुन्हा एकदा एखाद्या परकीय सत्तेचे गुलाम होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
















