मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अस उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वा-यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील ३ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. मात्र या पावसासोबत आलेल्या तीव्र वादळी वा-यामुळे उत्तर पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. मुंबईतील दादर, मुलुंड, बांद्रा आणि सांताक्रूझ परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तसेच मीरा-भाईंदर शहरातही सकाळी अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांच्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना तात्काळ आराम मिळाला आहे.
रत्नागिरीत आंबा पिकाला फटका
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाचा वेग वाढला आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात दमदार सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील सापुचेतळे आणि खानवली भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे ग्रामीण भागात शेतीकामांना वेग मिळणार आहे. मात्र ऐन मे महिन्यातील या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकणात अशाच पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सोलापुरात तुफान पाऊस; पुणे प्रशासनाला जाग
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या सोलापूर शहरात आणि परिसरात अचानक मुसळधार पावसाचे आगमन झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या या जोरदार पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या सोलापूरकरांची धावपळ उडाली. पण उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. तर पुण्याच्या भोरमध्ये काल झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचले होते.
छत्रपती संभाजीनगरात बैलजोडी दगावली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याला मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वादळाचा भीषण तडाखा बसला आहे. शिल्लेगाव, शिरेसायगाव, गोपालवाडी, वजनापूर आणि देवळीसह अनेक गावांमध्ये वादळामुळे घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. देवळी गावात वीज पडल्याने परसराम तायडे यांची ७५ हजार रुपयांची बैलजोडी जागीच दगावली. महावितरणचे वीज खांब कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतक-यांनी काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यात घरांची पडझड आणि पिकांचे नुकसान
बीड, केज आणि पाटोदा तालुक्याला सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. केज तालुक्यातील युसुफ वडगाव, सादोळा, भालगाव परिसरात अनेक घरांचे पत्रे उडाले. तसेच मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे शेतक-यांच्या आंबा बागा आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पुण्यातील शेतक-यांकडून केली जात आहे.
















