पुणे : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील प्रभावशाली महिला नेत्या तथा शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी दिलेला हा राजीनामा अद्याप पक्षाकडून मंजूर झालेला नाही, पण त्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील या गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज होत्या. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बोलण्यावरून पक्षाच्या दुस-या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर पक्षाने ठोंबरे पाटील यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली होती. या घटनेनंतर त्यांची नाराजी उघड झाली होती.
आता चर्चा आहे की, रुपाली ठोंबरे पाटील या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले याही होत्या. या भेटीनंतर शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले होते, श्रीकांत शिंदे यांची मी खासदार निधीच्या कामासाठी भेट घेतली होती. जर शिंदे गटाने मला चांगली संधी आणि ऑफर दिली तर मी नक्कीच विचार करेन. कुणामुळे तरी माझे प्रवक्तेपद गेले, तरी मी काम थांबवले नाही.असं त्यांनी म्हटले होते.

