23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्या‘युपीएससी’ने पूजा खेडकरला ठरवले दोषी!

‘युपीएससी’ने पूजा खेडकरला ठरवले दोषी!

पुणे : वृत्तसंस्था
आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बाबत युपीएससीने मोठा निर्णय दिला. पूजा खेडकरला युपीएससीने दोषी ठरवले आहे, खेडकरची उमेदवारीही रद्द केली. उपलब्ध नोंदींच्या तपासणीनंतर ‘युपीएससी’ला खेडकर सीएसई-२०२२ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली.

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केली. नियुक्ती दरम्यान त्यांनी फक्त ओबीसी किंवा अपंगत्व प्रमाणपत्रच नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र देखील बनावट सादर केले आहे. या प्रमाणपत्रांची पडताळणी न करता त्यांची नियुक्ती कशी झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. यासोबतच पूजाला व्हेरिफिकेशनसाठी अनेकवेळा बोलावूनही ती हजर झाली नाही, याचीही चौकशी सुरू आहे.

लैंगिक छळाची तक्रार केली, म्हणून… पूजा खेडकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी सुरु झाली. यामध्ये युपीएससीने अधिकारी म्हणून काही संरक्षण दिलेले असते. यानुसार पोलिसांनी माझी चौकशी करू नये तर युपीएससीने करावी अशी मागणी करत अटकेला खेडकर यांनी विरोध केला आहे. तसेच आपण ४७ टक्के अपंग असल्याचेही एम्सचे प्रमाणपत्र कोर्टासमोर सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केला.

खेडकर यांच्या वकील वीणा माधवन यांनी खेडकर यांची बाजू मांडली. पूजा खेडकर यांना उच्च न्यायालयाने मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिल्याचा दावा केला. यावर कोर्टाने माधवन यांना कोर्टाचे आदेश सादर करण्याची विचारणा केली आहे. युपीएससीने खेडकर यांनी तीन जादाचे प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला. तुम्ही म्हणता की हायकोर्टाने तुम्हाला त्याची परवानगी दिली, ती सादर करावी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीके जंगला यांनी म्हटले. यावर युपीएससीच्या वकिलांनी खेडकर या अतिरिक्त परीक्षा देण्यास पात्र आहे असा उच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नव्हता, असे म्हटले.

वैद्यकीय मंडळाने पूजा खेडकर ही एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेली उमेदवार असल्याचे म्हटलेले आहे. तिला कायमस्वरूपी बेंचमार्क अपंगत्व आहे. तिच्या संपूर्ण शरीरात ४७% अपंगत्व आहे. याचे प्रमाणपत्र एम्सने दिले आहे, मग ही फसवणूक कशी म्हणता येईल असा युक्तीवाद खेडकरच्या वकिलांनी केला.

युपीएससीने दोषी हा शब्द वापरला आहे. आम्हाला फक्त नोटीस आलेली आहे. फौजदारी खटला दाखल करण्यात युपीएससीला एवढी घाई का झाली? मला माझी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती. फौजदारी खटला आणि अटकेच्या भीतीमुळे मी माझी बाजू मांडू शकत नाही, असा युक्तीवाद खेडकर यांच्या वकिलांनी केला. माझी बाजू मांडण्यासाठी मला अटकपूर्व जामीन हवा आहे, असे वकिलांनी कोर्टाला सांगितले.

खेडकर यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे आणि म्हणूनच हे सर्व तिच्याविरुद्ध केले जात आहे, असाही गंभीर आरोप खेडकर यांच्या वकिलांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR