लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरापासून जवळच कातपूर शिवारात असलेल्या पंकज लॉज येथे बाहेरगावाहून महिला बोलावून तिथे वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून लातूरच्या अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून मोबाईलसह रोख रक्कम व इतर साहीत्य असा ७५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
लातूरच्या शेजारीच कातपूर शिवारामध्ये पंकज लॉज आहे. या लॉजचा चालक विकास बापूसाहेब पडवळ रा. कातपूर हा आपल्या लॉजवर बाहेरगावाहून महिला बोलावून येथे त्यांची राहणे, खाणे, पिणे अशी व्यवस्था करून पुरूषांना आकर्षीत करून त्या ठिकाणी स्वत:च्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून या पथकाने धाड टाकली. तेंव्हा तिथे तीन पीडीत महिला व चार पुरूष आढळून आले. यावेळी या पथकाने त्या पीडीत महिलांची सुटका केली. या पोलीस पथकाने लॉज चालक विकास पडवळ यांच्यासह अन्य चार जणांवर कारवाई केली आहे. हे सर्व जण वेश्या व्यवसाय चालविण्यासाठी वेगवेगळ्या कृती करीत होते. या पाच जणांकडून पोलिसांनी ७ मोबाईल, ११ हजार २०० रूपये रोख, कंडोमचे पॉकेट, विदेशी दारू, बिअर बाटल्या असा एकूण ७५ हजार ३६० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरच्या शेजारीच असलेल्या लॉजवर अशा पद्धतीने हा चालू होता. या शहरातील नागरीक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जाऊन अवैध कृती करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.