हिंगोली : प्रतिनिधी
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हिंगोलीमधून उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधामध्ये नवरा अडथळा ठरत असल्याकारणाने बायकोने प्रियकराच्या मदतीने नव-याला संपवले. नंतर नव-याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलीस तपासात पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर हिंगोली हादरली.
शिवाजी पोटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोटे हिंगोलीतील औंढा तालुक्यातील कुरूंदा गावातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पोटे हे त्यांचे कुटुंब घेऊन भेंडेगाव परिसरात सालगडी म्हणून शेतात काम करायचे. पत्नी मंगल आणि त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत काम करत असे.
शिवाजी यांची मुले शिरड शहापूर येथील शाळेत शिक्षण घेत होते. मुलांना दररोज शाळेत सोडण्यासाठी त्यांची पत्नी मंगल पोटे ही जात असे. दरम्यान, शाळेतील स्वयंपाकी म्हणून काम करणा-या ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत मंगलचे प्रेमप्रकरण जुळले. मंगला आणि ज्ञानेश्वर यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण शिवाजी यांना लागताच, त्यांनी या नात्याला विरोध केला. दररोज शिवाजी आणि मंगलामध्ये भांडणे होत. प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोधा करत असल्यानं पत्नीनं पतीला संपवण्याचा कट रचला. मंगला आणि तिच्या प्रियकराने शिवाजी यांना शेत शिवारात असलेल्या आखाड्याबाहेर बोलाऊन घेतले.
नंतर त्यांच्या डोक्यात लाकडाने वार करत जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर दोघांनी मिळून शिवाजी यांचा मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला. यानंतर पत्नीने मुलांना वडील हरवले असल्याचे सांगितले. याप्रकरणाची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. तपासात पत्नीने विवाहबा संबंधामुळे शिवाजी यांचा काटा काढला असल्याचं कबुल केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

