लातूर : प्रतिनिधी
जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता आवश्यक आहे. मानवते शिवाय कोणताही देश जीवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्वाचे आहे. आज रामेश्वर (रूई) येथे विश्वनाथाच्या रुपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे. जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.’ असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी खासदार सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर (रूई) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाचे’ लोकर्पण लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई) या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. विजय भटकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखील भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, रामविलास वेदांती, या वास्तूचे संकल्पक, संरचना, नियोजक व निर्मितीकार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, आमदार रमेश कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड, सरपंच सचिन कराड, राजेश कराड उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, संपूर्ण जगाला विश्वशांती आणि विश्व कल्याणाचा संदेश विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जाईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत देशाचे खरे रुप रामेश्वर येथे दिसून येते आहे. हा मानवता भवनच संपूर्ण जगाची दिशा दर्शविणारा आहे. येथून भारतीय चिंतन, परंपरेचा संदेश विश्वात पोहचणार असून सर्वांनी त्याचे अनुकरण करावे. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पसायदान हे मानव उध्दारासाठी आहे. यावेळी डॉ. राहुल कराड, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. राम विलास वेदांती, डॉ. मंगेश कराड यांची भाषणे झाली. यावेळी डॉ. गौतम बापट व प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी आभार मानले.

