23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसोलापूरशहरात अवैध धंदे फोफावले

शहरात अवैध धंदे फोफावले

सोलापूर :शहराच्या विविध भागांत मटका, जुगाराचे प्रमाण वाढले आहे. खेळविणारे मालामाल, तर खेळणारे कंगाल होत आहेत. ज्येष्ठांसह युवावर्ग मोठ्या प्रमाणात या मटक्याच्या विळख्यात बुडाला आहे. परिणामी त्यांचे कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

काहींना जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार सोलापूर शहरात राजरोसपणे सुरू आहे. शहरात मटका, जुगार, दारू विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. दिवसागणिक या अवैध व्यवसायांची उलाढाल वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता रस्त्यारस्त्यांवर आडोसा पाहून चालविला जात आहे. त्यामुळे या धंद्याला पोलिसांचा वरदहस्त आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.

अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत. शहरात अनेक पानटपरीवर मटका घेतला जातो. लक्ष्मी मार्केट, राजेंद्र चौक, कन्नाचौक, जुना अक्कलकोट नाका, बाळी वेस आदी ठिकाणी टपरीवजा दुकानामध्ये मटका घेतला जातो. शहरातील एसटी बसस्थानक परिसरात मटका घेतला जातो.काही ठिकाणी बंद दाराआड, तर काही ठिकाणी पडदा टाकून मटका सुरू आहे. मटका चालविताना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती नसते. विशेष म्हणजे दिवसभर या मटका बुकींवर गर्दी असते.

काही दिवसांपूर्वी चोरून, लपून खेळला जाणारा हा मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे. सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मटका बुकी चालतात. ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते. शहरात खुलेआम मटका सुरू असल्याने मटका खेळणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.

तरुण खिशात पैसा नसेल, तर उधार मटका खेळू लागले आहेत. मटक्यातून झालेली लाखो रुपयांची उधारी फेडण्यासाठी खासगी सावकारांकडून दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे घेतले जात असल्याची चर्चाही ऐकण्यास मिळाली. यामुळे संपूर्ण कुटुंब सावकारी विळख्यात अडकत आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी मटक्याचे पेव वाढत आहे. या अवैध व्यवसायावर पोलिस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या व्यवसायांना बळ देते का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहर पोलिसांच्या वतीने शहरातील अवैध धंद्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी ठोस पावलेही उचलली जातात; मात्र कारवाईत सातत्याची गरज आहे. ठोस कारवाईची आवश्यकता आहे, तरच अशा अवैध व्यवसायांना आळा बसणार आहे.शहरातील अवैध व्यवसायांवर शहर पोलिसांकडूनकडक कारवाई करून अवैध व्यवसायांना आळा घालण्यात येईल.असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ)विजय कबाडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR