लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप करत लातूर व्यापारी महासंघाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.
लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील काही मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ज्युनिअर केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य थेट शाळेमार्फत विक्री केले जात आहे. वह्या, पुस्तके, गणवेश, स्टेशनरी तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट ठिकाणाहूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. काही ठिकाणी विशिष्ट प्रकाशकांची पुस्तके किंवा विशिष्ट कंपनीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात आहे. परिणामी पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शिक्षण देण्याचे काम करणा-या संस्थांनी व्यवसायाचे स्वरूप धारण करणे योग्य नसून, यामुळे स्थानिक व्यापा-यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनावर लातूर शहरातील व्यापारी रामेश्वर भराडीया, गोकुळ जैन, साहिल कुलकर्णी, मनोज इंदुरे, गणेश काकडे, कीर्ती जीएम स्टोअर्स, मानसी पुस्तकालय, बालाजी ट्रेडर्स, शिवम ट्रेडर्स, नेहा स्टेशनरी शॉपी, वरवटे सुधीर, शेख सत्तार, मारुती रतन पवार, श्री गणेश, श्री समर्थ बुक सेल्स, पियुष कचोरिया, भारतीय पुस्तकालय, सुपर शॉपी एजन्सी, यश बुक स्टॉल, माऊली एजन्सी, गटागट स्टोअर्स, शिवसागर जनरल, शिवकृष्णा डिपार्टमेंटल, सिद्धेश्वर पांचाळ, वैभव ढोले, रज्जाक शेख आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
















