जयपूर : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रात एनडीए नसून यूपीए सरकार असते तरी राम मंदिर बांधले असते असे म्हटले आहे. अशोक गेहलोत यांनी यामागे एक मोठे कारण देखील सांगितले आहे.
अशोक गेहलोत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत आणि निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस आल्यास राम मंदिराला कोणताही धोका नाही असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले गेले आहे. त्यांना संभ्रम आहे. सरकार एनडीएचे नसते आणि यूपीएचे असते, भाजपाचे नसते आणि काँग्रेसचे असते तरीही मंदिर बांधले गेले असते कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. ते संभ्रम पसरवत आहेत. मोदीजी खोटे बोलतात. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजले आहे असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
राजस्थानमध्ये २५ जागांसाठी १९ एप्रिल आणि २६ एप्रिलला दोन टप्प्यात मतदान झाले. मतदान संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसचे राजस्थानचे नेते आता इतर राज्यांतील आपल्या पक्षाच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत. याच दरम्यान अशोक गेहलोत हे सध्या उत्तर प्रदेशातील अमेठीला भेट देत असून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करत आहेत. भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.