मुंबई : प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून मुंबईमधील चेंबूर आणि पुण्यातील विश्रांतवाडी या दोन वसतिगृहांच्या ठिकाणी भर पावसात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. वसतिगृहातील मिळणारे निकृष्ट भोजन, अस्वच्छता, निर्वाह भत्ता मिळण्यास होणारा विलंब, मुंबई आणि पुण्यात विभागीय स्तरावरील एक हजार विद्यार्थी क्षमतेची नवी वसतिगृह उभारणी सुरू करण्याबाबत मागणी करत विद्यार्थ्यांनी भर पावसात भिजत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विविध प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान आंदोलन केले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असे लेखी आश्वासन सामाजिक न्याय विभागाने दिले होते. मात्र, जवळपास दीड वर्ष उलटले तरी या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, यामुळे परत एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे, सरकारच्या कोणत्याही अधिका-याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, भर पावसात आंदोलन करताना आंदोलनाच्या दुस-या दिवशी चेंबूर येथे संदीप कांबळे या विद्यार्थ्याची तब्येत खालावली.
त्यानंतर त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालय, गोवंडी येथे दाखल करण्यात आले.
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळचेपी
वसतिगृहांमध्ये साफसफाई व सुरक्षेकरिता नेमण्यात आलेली बा स्त्रोत क्रिस्टल कंपनी नियमित स्वच्छता करत नाही, तसेच कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना पुरविले जाणारे भोजन देखील अनियमित व निकृष्ट दर्जाचे आहे. सामाजिक न्याय विभागासोबत अनेकदा पत्र व्यवहार देखील केले मात्र सामाजिक न्याय विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.
विश्रांतवाडी, पुणे येथील १००० विद्यार्थ्यांचे वसतिगृह पूर्ण क्षमतेने आजतागायत सुरू नसल्याने सामाजिक न्याय विभागाकडून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळचेपी केली जात आहे. तसेच सामाजिक न्याय मंत्री देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी माहिती आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित कांबळे यांनी दिली.