मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाने खळबळ उडवली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, हनी ट्रॅपशी संबंधित माझ्याकडे सीडी आहे आणि ‘वेळ आली की तिकिट लावून हे सत्य जनतेसमोर आणू.’’ असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणात ७२ आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते अडकले असून, यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होऊ शकतात. दुसरीकडे, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही याप्रकरणी सरकारवर गंभीर आरोप करताना, नाशिक, ठाणे आणि मुंबई ही हनी ट्रॅपची केंद्रे असल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे महत्त्वाचे दस्तऐवज असामाजिक तत्त्वांच्या हाती गेल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नाशिक हनी ट्रॅप प्रकरणावर भाष्य करताना स्फोटक दावा केला. ते म्हणाले, ‘‘हनी ट्रॅपवरून मुख्यमंत्री म्हणतात, ‘ना हनी आहे ना ट्रॅप.’ पण सरकारकडे आणि विरोधी पक्षाकडेही याबाबत मोठी माहिती आहे. मागील काळात सत्तापालटही अशाच सीडीमुळे झाले. या प्रकरणात मोठमोठी माणसे अडकली आहेत, असे ते म्हणाले.
आम्ही वेळ आली की हे पुरावे जनतेसमोर आणू. यासाठी दहा-वीस हजारांचे तिकिट लावून खास लोकांना हे चित्र दाखवावे लागेल, इतका भक्कम पुरावा आमच्याकडे आहे. वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पुरावे जाहीरपणे दाखवण्यास टाळाटाळ केली, कारण यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या प्रकरणावर आक्रमकपणे सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘‘नाशिक, ठाणे आणि मुंबई ही हनी ट्रॅपची प्रमुख केंद्रे आहेत. यामुळे महाराष्ट्राचे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज असामाजिक तत्त्वांच्या हाती लागले असून, याचा परिणाम राज्याला भोगावा लागेल. मी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवला, पण सभापतींनी तो माझ्याकडेच ठेवण्यास सांगितले. जर त्यांनी मागितला असता, तर मी तो दिला असता. पण हे पुरावे जाहीरपणे दाखवता येणार नाहीत, कारण यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होऊ शकतात.’’