नागपूर : प्रतिनिधी
नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका याचिकेवर सुनावणी करताना उद्याची मतमोजणी २१ तारखेपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप करत त्या गोंधळाला राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. ते आपला संताप व्यक्त करताना म्हणाले, नागपूरच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाने या निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे. हा काय पोरखेळ आहे. याला राज्य सरकार व निवडणूक आयोग हे दोघेही जबाबदार आहेत.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयोगाने घाईघाईने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला. त्यांच्यावर सत्ताधा-यांचा प्रचंड दबाव होता. आम्ही ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले हे त्यांना लोकांच्या मनावर बिंबवायचे होते. अरे हा पोरखेळ कशाला करता तुम्ही? हे सरकार कोणत्या दिशेने काम करतंय? आज निवडणुका आहेत. उद्या मतमोजणी होणार होती. ती आता २१ वर गेली. या गोंधळाला राज्य सरकार व निडवणूक आयोग जबाबदार आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे हे आता लपून राहिले नाही. आयोग सरकारच्या इशा-यानुसार काम करत आहे. आतापर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या पण यापूर्वी असा खेळखंडोबा कधीच झाला नव्हता. फडणवीस सरकारच्या काळात हे पहिल्यांदाच घडले आहे. उद्या निकाल लागला असता तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर झाला असता. महापालिका निवडणुकीवर झाला असता.
निवडणुका लांबणीवर टाकून मतमोजणीत अडथळे निर्माण केले जात आहेत. सत्ताधा-यांकडून पैशांचा भरमसाठ वापर केला जात आहे. हा मतचोरीचा तर प्रकार नाही ना? निकाल विरोधात जाणार हे पाहून निवडणुकीचा निकाल फिरवण्याचा प्रयत्न यातून होत आहे. सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकावले जात आहे. एकमेकांना बघून घेण्याची व कापण्याची भाषा होत आहे. हे सर्व पाहता सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल सरकारच्या बाजूने येत नाही म्हणून हा मतचोरीचा डाव खेळला जात आहे. हे करून त्यांनी निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न केला, तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप महायुतीचे सरकार करत आहे असा संदेश जनतेत जाईल, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने २४ नगर परिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. येथे २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आज (२ डिसेंबर) आणि २० डिसेंबर दोन्ही टप्प्यांतील निवडणूक पार पडल्यानंतर सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर केले जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

