15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeसंपादकीयहार-जीत कोणाची?

हार-जीत कोणाची?

बिहार विधानसभा निवडणुकीचे दुस-या आणि अंतिम टप्प्याचे मतदान मंगळवारी शांततेत पार पडले. अंतिम टप्प्यात २० जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी मतदारांनी आपला कौल नोंदवला. या टप्प्यात आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ६८.६५ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६४.६६ टक्के मतदान झाले होते. दुस-या टप्प्यात मुस्लिमबहुल किशनगंजमध्ये सर्वाधिक ७७.७५ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ कटिहार (७५.२३ टक्के), पूर्णिया (७३.७९ टक्के), सुपौल (७०.६९ टक्के) आणि अररियात ६७.७९ टक्के मतदान झाले. हे सर्व जिल्हे नेपाळलगतच्या सीमेजवळ आहेत. दक्षिण बिहारमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का अधिक राहिला. दुस-या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्र्यांसह एकूण १३०२ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंदिस्त झाला. दुस-या टप्प्यातील मतदानासाठी अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. बिहारमध्ये यंदा बंपर मतदान झाल्याने आता सा-यांच्या नजरा १४ नोव्हेंबरकडे लागल्या आहेत. २४३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागा लागतील.

बिहारमध्ये दुस-या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर प्रमुख ९ सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) १३३ ते १६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. अर्थात मतदानोत्तर चाचण्या चुकीच्याही ठरू शकतात. या आधी चाचण्यांचे हे अंदाज अनेकवेळा चुकीचे ठरले आहेत. २०२० मध्ये बहुतांश सर्वेक्षणात तेजस्वी यादव यांच्या ‘महागठबंधन’च्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात एनडीएने १२५ जागा जिंकून सत्ता राखली होती. यावेळी महाआघाडीला ७० ते १०८ जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. सत्ताधारी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे. जवळपास सर्वच चाचण्यांमध्ये बिहारमध्ये रालोआचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांना दुस-या क्रमांकाचे स्थान देण्यात आले असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष तिस-या स्थानावर राहील असे दिसते. नऊ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांना इंडिया आघाडी पायउतार करणार का याकडे नजरा लागल्या आहेत.एनडीएच्या घटक पक्षांमध्ये प्रमुख असलेल्या भाजपला सर्वाधिक ६७ ते ७० जागा मिळू शकतील. २०२०मध्ये लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक ७७ जागा जिंकल्या होत्या.

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या बिहारमधील प्रवेशाची खूपच चर्चा झाली होती परंतु त्यांच्या पक्षाला यश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यांना जास्तीत जास्त ५ जागा मिळू शकतात. कोणत्याही सर्वेक्षणाने त्यांना दोन आकडी जागा दिलेल्या नाहीत. म्हणजे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा बार फुसका निघणार! पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक ‘भास्कर’, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे. पीपल्स पल्सच्या चाचणीनुसार एनडीएला १३१ ते १५९ जागा मिळून त्यांची सत्ता येण्याचा दावा करण्यात आला आहे तर महाआघाडीला ७५ ते १०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीचा जो काही कौल येईल त्यातून बिहारमध्ये कोणाचे सरकार असेल हे तर स्पष्ट होईलच, पण याचे परिणाम केवळ बिहारपुरतेच मर्यादित राहणार नाहीत, तर देशातील केंद्रीय राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. एकतर महाआघाडीला बहुमत मिळाले तर देशातील राजकारणाचा एकूणच मूड बदलेल आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती केंद्र सरकारसाठी मोठीच डोकेदुखी ठरेल. त्यामुळे बिहारची सत्ता कायम राखण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे. निसटत्या बहुमताने का होईना एनडीएला सत्ता मिळाली तरी तेथे मुख्यमंत्रिपदावरून मोठ्या घडामोडी घडतील असा अंदाज आहे. नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीश कुमार यांना डावलून भाजप मुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेईल असे बोलले जात आहे. अर्थात नितीश कुमार म्हणजे एकनाथ शिंदे नव्हेत हेही लक्षात घ्यायला हवे. राजकीय स्वार्थासाठी कशीही पलटी मारण्याची त्यांची ख्याती आहे. शिवाय लोकसभेतील १४ खासदार हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. तेव्हा नितीश कुमार सहजासहजी मुख्यमंत्रिपद सोडण्याची शक्यता नाही. केंद्रातील भाजप सरकार हे अल्पमताचे सरकार आहे आणि ते बहुतांशी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या पक्षातील खासदारांच्या पाठिंब्यावर तगून आहे.

त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपला नितीश कुमारांना सहजासहजी डावलता येणार नाही. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भाजपची केंद्रातील स्थिरता आणि नितीशकुमार यांचे राजकीय अस्तित्व यासाठी महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीच्या दृष्टीनेही ही निवडणूक त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सातत्याने मतचोरीचे आरोप करूनही जर इंडिया आघाडीला यश मिळाले नाही तर भविष्यात मतचोरीच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जाणार नाही. किंबहुना अशा आरोपांमुळे राजकीय वातावरणावर काहीही परिणाम होत नाही या भाजपच्या विचाराला पाठबळ मिळेल. या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या मतचोरीच्या आरोपांना समर्थन मिळणार की भाजपचा विदेशी घुसखोरीचा मुद्दा प्रभावी ठरणार ते स्पष्ट होईल. ऐन निवडणुकीच्या काळात बिहारमधील सुमारे दीड कोटी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी जे दहा दहा हजार रुपये टाकले गेले तो मुद्दा इंडिया आघाडीला जड जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR