मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर
हिंगोली : प्रतिनिधी
गेल्या ३-४ दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली जिल्ह्यातही मोठा पाऊस झाला असून, पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच ओढ्याला आलेल्या पुरात २ महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना वसमत तालुक्यात घडली.
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. तालुक्यातील गुंडा गावच्या शिवारातही मुसळधार पाऊस झाल्याने गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला. या पुरात २ महिला वाहून गेल्या आहेत. या दोन महिला शेतातून घरी परतत असताना ओढ्याच्या पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी या दोन्ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. सखुबाई भालेराव आणि गयाबाई सारोळे असे वाहून गेलेल्या दोन महिलांची नावे आहेत. या घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी तातडीने शोध कार्य सुरू केले. त्यानंतर वसमतचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारही घटनास्थळी पोहोचले. उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. यात या दोन्ही महिलांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वर्ध्याच्या बोरगाव गणेशनगर येथे तीन वर्षाचा बालक नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. गणेशनगर येथे राहत असलेल्या पंकज मोहदुरे यांच्या घराजवळ मोठी नाली आहे. या नालीत वाहून गेल्याने ३ वर्षीय बालक डुग्गू पंकज मोहदुरे याचा मृत्यू झाला. घरासमोरील मोठ्या नालीत पडल्याने त्याचा बळी गेला.

