मुंबई : वृत्तसंस्था
जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचे नेटवर्क फक्त देशापुरते मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात हे उघड झाले आहे. ईडीने मुंबई ते पनामापर्यंत पसरलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
तपासात असे समोर आले की, छांगुर बाबाला परदेशातून मोठे फंडिंग मिळाले होते. या फंडिंगचा वापर देशातील लोकांचे धर्मांतर करण्यासाठी आणि बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात होता. छांगुर बाबा आणि त्यांच्या जवळच्या सहका-यांच्या २२ बँक खात्यांच्या चौकशीत ईडीला तब्बल ६० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत.
मुंबईत छांगुर बाबाने ‘रुनवाल ग्रीन्स’ नावाचं कॉम्प्लेक्स खरेदी केले होते. ईडीला संशय आहे की, हा व्यवहार बेकायदेशीर फंडिंगमधून मिळालेल्या पैशाने झाला होता. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की, छांगुर हा पनामा येथील ‘लोगोस मरीन’ नावाच्या कंपनीशी जोडलेला आहे. ईडीने या कंपनीचे कागदपत्रे आणि रेकॉर्ड ताब्यात घेतले आहेत.
ईडीने आपल्या तपासात नवीन रोहरा आणि नीतू रोहरा उर्फ नसरीन यांनाही या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा महत्त्वाचा भाग मानले आहे. हे दोघेही संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या व्यवहारात छांगुर बाबाला मदत करत होते. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे.