लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात डबल एस बारदाण्यात (प्लॉस्टीक) शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने त्यास हमालांनी विरोध करत आडत बाजार बंदची हाक दिली होती. त्यामुळे गुरूवारपासून सलग तीन दिवस शेतमालाचा सौदा निघाला नाही. लातूर बाजार समितीच्या पदाधिका-यांनी आडते-हमालांची शनिवारी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले. त्यामुळे सोमवारी सकाळी आडत बाजारात सकाळी बाजार समितीचा झेंडा फिरवल्यानंतर शेतमालाचा सौदा निघाला. लातूरच्या आडत बाजार बंदची कोंडी अखेर तीन दिवसानंतर फुटली आहे. त्यामुळे शेतकरी व सर्व घटकामधून समाधान व्यक्त होत आहे.
लातूर जिल्हयातील इतर बाजार समितीच्या प्रमाणे लातूरच्या आडत बाजारात शेतक-यांकडून डबल एस बारदाण्यात (प्लॉस्टीक) शेतमाल विक्रीसाठी येत असल्यामुळे हमालांनी त्यास विरोध म्हणून हमालांनी गुरूवारपासून आडत बाजार बंदची हाक दिली होती. नेहमी प्रमाणे शेतमालाचा सौदा काढण्यासाठी आडत बाजारात सकाळी झेंडा फिरवूनही सलग तीन दिवस शेतमालाचा सौदा निघाला नव्हता.
लातूर बाजार समितीने शेतक-यांची कोंडी होऊ नये, सर्व घटकांना न्याय मिळावा म्हणून बाजार सुरू करण्याच्या दृष्टीने हमाल, आडते यांच्या बैठका घेतल्या. त्यामुळे सोमवारी आडत बाजार सुरू करण्यासाठी सर्व घटकांनी होकार दिला. नेहमी प्रमाणे लातूरच्या आडत बाजारात सकाळी झेंडा फिरला. व्यापा-यांनी आडत्यांच्या दुकानावर जात शेतमालाचा सौदा पुकारला. त्यामुळे तीन दिवसानंतर शेतमालाचा सौदा निघाल्यामुळे शेतकरी व सर्व घटकामधून समाधान व्यक्त होत आहे.

