वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारत आणि चीनसह सात देशांमधील ३२ कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. इराणच्या क्षेपणास्त्र विकास आणि इतर शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, त्यांनी चीन, इराण, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि भारतासह इतर देशांमध्ये असलेल्या तब्बल ३२ संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.
इराण आण्विक वचनबद्धतेचे पालन करत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी आणि आर्थिक गुप्तचर विभागाचे उपसचिव जॉन के. हर्ले यांनी याबद्दल माहिती देत म्हटले की, इराण जगभरातील आर्थिक प्रणालींचा वापर करून पैशाची देवाणघेवाण करत आहे. आण्विक आणि पारंपारिक शस्त्र कार्यक्रम करत आहे. इराणवर आण्विक कार्यक्रम रद्द करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे.
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफ कमी करण्याबद्दलचे मोठे संकेत देण्यात आले. मात्र, एच-१बी व्हिसाच्या नियमात केलेल्या बदलामुळे भारतीय नागरिकांना मोठा फटका बसला. व्हिसाच्या नियमात सातत्याने बदल करताना अमेरिका सध्या दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताबद्दल बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान करत म्हटले होते की, भारतीय लोक सध्या माझ्यावर नाराज आहेत.

