23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeसोलापूरवारक-यांच्या सुरक्षेसाठी १ हजार ६२५ पोलिस कर्मचारी

वारक-यांच्या सुरक्षेसाठी १ हजार ६२५ पोलिस कर्मचारी

पंढरपूर : कार्तिकी यात्रेत भाविकांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यासाठी आणि यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.

कार्तिक शुद्ध एकादशी १२ नोव्हेंबर रोजी असून या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

कार्तिक वारीत पोलिस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी १ हजार ६२५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, १० पोलिस उपअधिक्षक, २३ पोलिस निरीक्षक, ९० सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १ हजार पोलिस कर्मचारी व ५०० होमगार्ड तसेच १ एसआरपीएफ कंपनी, दोन बीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत.

वारी कालावधीत गदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी १० वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरीसारख्या घटना रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५० सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारक-यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. वाहतूक नियमनासाठी १३ ठिकाणी डायव्हरशन पॉइंट सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खासगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर १६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR