चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्णाण झाला असून आता सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर सत्तास्थापनेसाठी द्रमुक आणि अद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला, तर ‘टीव्हीके’चे सर्व १०७ आमदार सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिला आहे. या भूमिकेमुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
२३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांचा ‘टीव्हीके’ हा १०७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलेले नाही. दुसरीकडे, सत्ता टिकवण्यासाठी द्रमुक (५९ जागा) आणि अद्रमुक (४७ जागा) या दोन्ही द्रविडीय पक्षांनी पडद्यामागून हालचाली सुरू केल्याच्या चर्चा आहेत. टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन कट्टर शत्रू एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने विजय यांच्या गोटात कमालीचा असंतोष पसरला आहे.
दरम्यान, विजय यांचा पक्ष सध्या व्हीसीके, डावे पक्ष आणि मुस्लिम लीग यांसारख्या द्रमुकच्या मित्रपक्षांशी संवाद साधून बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप या पक्षांकडून कोणताही ठोस शब्द मिळालेला नाही. त्यामुळे तमिळनाडूत सत्ता स्थापन होणार की पुन्हा निवडणुकां होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आकड्यांचे गणित आणि राजकीय कोंडी
टीव्हीके : १०८ जागा जिंकल्या (विजय दोन जागांवर निवडून आल्याने तांत्रिकदृष्टया संख्या १०७ होईल).
काँग्रेसचा पाठिंबा : ५ आमदार (एकूण संख्याबळ ११२ वर, बहुमतापेक्षा ६ कमी).
द्रमुक : ५९ जागा.
अद्रमुक : ४७ जागा.
लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही
जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. तरीही प्रस्थापित पक्ष छुप्या युतीद्वारे लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत आहेत. जर जनमताचा अनादर झाला, तर आमचे सर्व आमदार राजीनामे देतील असे टीव्हीकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. खुद्द विजय यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, पक्षांतर्गत हालचाली पाहता ते कोणत्याही तडजोडीच्या मूडमध्ये नसल्याचे दिसत आहे.
















