चाईबासा : झारखंडमध्ये चकमकीत ११ हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात गुरुवार सकाळपासून सुरक्षा दल आणि भाकपा (माओवादी) नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. गुरुवारी पहाटे चकमक सुरू झाली. आसपासचा परिसर गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड पोलीस, कोब्रा आणि सेंट्रल पोलीस फोर्सच्या जवानांच्या शोधमोहिमेदरम्यान १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी अनल दाच्या पथकाशी चकमक झाली. त्याच्या पथकात १४ हून अधिक नक्षलवादी आहेत. सतत सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ११ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले आहे. १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी अनल दा देखील मारला गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
नक्षलविरोधी कारवाईदरम्यान चकमक
सुरक्षा दल नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सारंडाच्या घनदाट जंगलात शोधमोहीम राबवत होते. याच दरम्यान, जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही मोर्चा सांभाळला, त्यानंतर चकमक तीव्र झाली.
सारंडाचा परिसर दुर्गम डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, जिथे नक्षलवाद्यांच्या दीर्घकाळापासून हालचाली आहेत. जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. संपूर्ण परिसर चोहोबाजूंनी वेढण्यात आला आहे.
५० लाखांचा बक्षीस असलेला
नक्षलवादी कमांडर ठार
कोल्हान विभागाचे डीआयजी अनुरंजन किस्पोट्टा यांनी चकमकीची पुष्टी करत सांगितले की, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत सुरक्षा दलांनी ५० लाख रुपयांच्या बक्षीस असलेल्या एका मोठ्या नक्षलवादी कमांडरलाही ठार केले आहे. मात्र, या दाव्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

