मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे ५ आणि शिवसेना शिंदे गटाचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १२२ सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ६२ जगांपासून महायुती आता केवळ ५३ जागा दूर आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचेही ४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपची विजयी घोडदौड
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह आता ज्योती पवन पाटील या २४ ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणा-या भाजप उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. याचे श्रेय रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला दिले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचेही वर्चस्व
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. २८ अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदारे राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे.

