Homeअंतरराष्ट्रीय१ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार

१ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार

ट्रम्प यांची मुदत जवळ येताच इराणचाही इशारा

तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली आहे. इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. यावर इराणचे प्रत्युत्तर समोर आले आहे. इराणचे राष्ट्रअध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी मंगळवारी सांगितले की, देशाच्या रक्षणासाठी तब्बल एक कोटी ४० लाखांहून अधिक नागरिक आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासाठी तयार आहेत.

देशाचे रक्षण करण्यासाठी एक कोटी ४० लाखांहून अधिक इराणी लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली आहे. मी सुद्धा इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार आहे आणि राहीन, असे विधान पेझेश्कियन यांनी केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची (ईस्टर्न टाइम) ‘मुदत’ निश्चित केली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी इराण होर्मुझची सामुद्रधुनी उघडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र यावर आता इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अंतिम मुदतीपूर्वी इराणकडून आव्हान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कथित मुदत जवळ येत असताना इराणने माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांच्या भीतीमुळे इराणी अधिका-यांनी तरूणांना वीज प्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांभोवती मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच इराणने युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला असून हा संघर्ष कायमचा संपुष्टात आणावा अशी मागणी केली आहे.

इराणवर तीव्र हल्ले
अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. शिराझमधील एका पेट्रोकेमिकल प्रकल्पासह इतर अनेक ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा हल्ले केले आहेत. इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनेक भागांमध्ये जीवितहानी झाली आहे. इस्रायलने इराणी जनतेला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणला एका रात्रीत नष्ट करू
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटले की, त्यांना संभाव्य युद्ध गुन्हे करण्याबद्दल मुळीच चिंता वाटत नाही. जर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात इराणने मंगळवारची रात्री ८ वाजण्याची अंतिम मुदत पाळली नाही तर इराणच्या पायाभूत सुविधा नष्ट करू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR