नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या विरोधात राजधानी दिल्लीत राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचा मोठा भडका उडाला आहे. देशातील ८८ शहरांमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज, २३ ऑक्टोबर रोजी पीपल अगेन्स्ट एसआयआर आणि शेतकरी संघटनांतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, परकला प्रभाकर, अभिनेते प्रकाश राज आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत असल्याने दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
दुसरीकडे, न्यायालयीन पातळीवरही आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांची स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कोर्टात दुपारी ३ वाजता पेशी होणार आहे; तर आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज संध्याकाळी निकाल देणार आहे.
देशव्यापी ‘हर गली जंतर-मंतर’ मोहीम
कनॉट प्लेस परिसरातील ऐतिहासिक गुरुद्वारा बंगला साहिब येथून दुपारी १ वाजता या मोर्चाची सुरुवात झाली आहे, तो थेट पटेल चौक येथील भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडकणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, मतदार यादीतून अनधिकृतपणे वगळण्यात आलेली नावे त्वरित पुन्हा समाविष्ट करावीत आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या आहेत. पोलिसांनी रोखल्यास त्याच ठिकाणी रस्त्यावर जनता संसद भरवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
देशभरात पडसाद
या आंदोलनाला डाव्या विद्यार्थी संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि काँग्रेस सेवा दलासह तब्बल १४५ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. देशभरातील ८८ शहरांत याचे थेट पडसाद उमटत असून संकेतस्थळावर लाईव्ह ट्रॅकरद्वारे आंदोलनाची माहिती दिली जात आहे.
नवी दिल्लीत कडक सुरक्षा आणि ट्रॅफिक निर्बंध
डाव्या संघटना आणि शेतकरी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दिल्ली पोलिसांनी मध्य दिल्लीत छावणीचे स्वरूप दिले आहे. गुरुद्वारा बंगला साहिब आणि निवडणूक आयोग परिसरातील रस्त्यांवर दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस कुमक, निमलष्करी दलाच्या तुकड्या आणि बॅरिकेड्स तैनात करण्यात आले आहेत.
सीजेपी नेत्यांची एसईएम कोर्टात पेशी
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेले कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दुपारी ३ वाजता स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समोर हजर केले जाणार आहे. शांतता राखण्यासाठी आवश्यक असलेल्या जातमुचलक्याच्या कायदेशीर अटींवर आज निर्णय होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनेही या दोघांना चौकशीची नोटीस बजावली आहे.
















