अकोला/नागपूर : राज्यातील एकूण बाल मृत्युपैकी १६.३ टक्के मृत्यू हे न्यूमोनिया आजारामुळे होतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आजारावर समाजामध्ये जागृती करणे, आजारापासून संरक्षण करणे, आजाराचा प्रतिबंध करणे याविषयी माहिती प्रचार-प्रसिद्धी करण्याचे उद्देशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. तीव्र श्वसनदाह आजारामुळे होणारे बाल मृत्यू टाळण्यासाठी राज्यात सांस मोहीम सुरू झाली.
सांस मोहिमेद्वारे ‘न्यूमोनिया यशस्वीपणे निष्फळ करण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कृती’ मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत प्रत्यक्ष घरोघरी भेटीद्वारे मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे आढळून येणा-या मुलांना उपचार देण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा दिली जाणार आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर निमोनिया आजाराबाबत जनजागृती, प्रसिद्धी, प्रचार करण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक औषध साठा, प्राणवायू साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. संदर्भ सेवेसाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले.
मोहिमेंतर्गत काय होणार?
मोहिमेसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचे आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. न्यूमोनिया (तीव्र श्वसनधाह) आजाराची लक्षणे खोकला, श्वास घेण्यास त्रास, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, गिळता न येणे किंवा मातेचे दूध ओढता न येणे, सेवन केलेले सर्व पदार्थ उलटून पडणे, झटके येणे, सुस्ती येणे किंवा बेशुद्ध पडणे, श्वास घेताना असामान्य आवाज, ओठांचा व हातांचा निळसर रंग, तीव्र श्वसन दाह व श्वास घेण्यास खूप जास्त त्रास, दोन महिने ते १२ महिने वयोगटातील बालक श्वास मिनिटाला ५० किंवा अधिक असतील, १२ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालक मिनिटाला ४० वा त्याहन अधिक श्वास, छाती आत ओढणे, प्राणवायू ९० टक्केपेक्षा कमी असणे आदी लक्षणे आहेत.
काय आहेत लक्षणे?
हे लक्षणे आढळून आल्यास आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क करावा व तपासणीसाठी घरी येणारे आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांचेकडून ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेतून निमोनिया आजाराद्वारे होणारे बाल मृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

