थेनी : तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील थेक्कम्पट्टी कारागृहातून सोमवारी मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार पाहायला मिळाला. १७ कैदी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून चार कैद्यांना पुन्हा पकडले आहे. दक्षिण विभागाचे पोलिस महानिरीक्षक विजयेंद्र बिदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित कैद्यांचा शोध घेण्यासाठी १७ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेक्कम्पट्टी कारागृहातील सर्व १७ कैदी एकाच बराकीत होते. त्यांनी कारागृहातून पलायनाचा कट रचला. अचानक मध्यरात्री एका कैद्याला आजारामुळे फिट (फेफरे) येत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मदतीसाठी कारागृह कर्मचारी बराकीत शिरताच, कैद्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि तिथून पळ काढला.
एक कर्मचारी गंभीर जखमी
मध्यरात्री अचानक झालेल्या हल्ल्यात थेनी जिल्हा कारागृहातील ग्रेड-२ अधिकारी थंगापांडी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जी. विलाक्कू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ड्युटीवर असलेल्या इतर दोन कारागृह कर्मचा-यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
















