25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्रमहागाई भत्त्यात २ टक्के वाढ

महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांना गणेशोत्सवाची भेट

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आपल्या कर्मचा-यांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के इतका झाला असून यामुळे तिजोरीवर वर्षाला १ हजार ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वित्त विभागाने सोमवारी वाढीव महागाई भत्त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

केंद्र सरकारी कर्मचा-यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचा-यांना महागाई भत्ता लागू करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार राज्य सरकारने १ जानेवारी २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव २ टक्के महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्यासह वाढीव भत्ता ऑगस्ट २०२५ या महिन्याच्या वेतनासोबत रोखीने दिला जाणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास १२ लाख कर्मचा-यांसह सेवानिवृत्त कर्मचा-यांना होणार आहे. १२ लाख शासकीय पूर्णकालिक कर्मचा-यांमध्ये शासकीय सेवेतील पाच लाख कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर मिळून सात लाख कर्मचा-यांचा समावेश आहे.

सरकारी कर्मचा-यांना गणपतीपूर्वी वेतन
येत्या २७ ऑगस्टपासून सुरु होणा-या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचा-यांना माहे ऑगस्ट २०२५ या महिन्याचे वेतन गणपतीपूर्वी दिले जाण्याची शक्यता आहे. वित्त विभागाकडून तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शासकीय सेवक, कंत्राटी कर्मचा-यांचे वेतन तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार याशिवाय इतर योजनांच्या लाभार्थ्यांना प्रलंबित आणि चालू हप्ता गणेश चतुर्थीच्या सणापूर्वी अदा करण्याची मागणी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR