चंदिगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ भाजपने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. संकल्प पत्राच्या माध्यमातून भाजपने २० मोठी आश्वासने दिली. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतकमध्ये संकल्प पत्र जारी केले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हरियाणातील २ लाख तरुणांना सरकारी नोक-या देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्व महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील.
तसेच घर गृहिणी योजनेच्या माध्यमातून ५०० रुपयांना सिलिंडर दिला जाईल. पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार, ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांना स्कूटर दिल्या जातील, हरियाणाला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवणार. याशिवाय इतरही अनेक आश्वासने भाजपने दिली आहेत. दुसरीकडे काँग्रेसने हरियाणातील जनतेला सात आश्वासने दिली आहेत.