नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांची देशभरात कारवाई सुरू आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान प्रायोजित एका आंतरराष्ट्रीय आणि अंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संपूर्ण नेटवर्कचे संचालन पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शाहजाद भट्टी करत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भट्टी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या निर्देशानुसार काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.
स्पेशल सेलच्या टायगर युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या मॉड्यूलवर छापा टाकला. एक आरोपी पंजाबातील गँगस्टर नेटवर्कशी जोडलेला असून तो शस्त्र आणि स्फोटक तस्करीत सक्रिय होता. इतर आरोपींना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून पकडले. पोलिसांच्या मते, सर्व आरोपी शाहजाद भट्टीच्या नेटवर्कअंतर्गत काम करत होते आणि हे संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानमधून चालवले जात होते.
दिल्ली-एनसीआरमध्ये हल्ल्याची योजना
चौकशीत उघड झाले की, हे दहशतवादी थेट पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे त्यांना आयएसआयकडून स्फोटक हल्ल्यांचे आदेश मिळत होते. दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू होती. पोलिसांना शंका आहे की, हे मॉड्यूल पंजाब, यूपी आणि एमपीमधील तरुणांची भर्ती करत होते.
नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला
शाहजाद भट्टीने काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये एका इखढ नेत्याच्या घराबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्याचे नेटवर्क भारतातील कुख्यात बिश्नोई गँग आणि दहशतवादी संस्था बब्बर खालसा इंटरनॅशनल सोबत सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यातील संघटना पूर्वी एकमेकींच्या विरोधात होत्या, मात्र करक च्या दबावाखाली आता हे गट एकत्र येऊन हायब्रिड थ्रेट मॉड्यूल निर्माण करत आहेत.
स्पेशल सेलची मोठी उपलब्धी
पकडलेल्या आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या या मॉड्यूलचा शोध लावणे ही स्पेशल सेलसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. आज सायंकाळी दिल्ली पोलिस मुख्यालयात ऍडिशनल सीपी (स्पेशल सेल) पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण ऑपरेशनची माहिती देतील.

