पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ३५वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (१० ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तीन मित्र राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. पाल बुद्रुक मार्गाने किल्ला चढत असताना पद्मावती माची परिसरात जिज्ञेश यांना थकवा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तेथेच बसवून त्यांचे दोन मित्र बालेकिल्ल्याकडे गेले. काही वेळानंतर जिज्ञेश यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिज्ञेश बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच गडावरील इतर पर्यटकांनी त्यांना मदत करण्यासाठी धाव घेतली. त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. या घटनेमुळे किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुरातत्व विभागाच्या कर्मचा-यांकडून बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच राजगड किल्ल्यावर कार्यरत असलेले पुरातत्व विभागाचे कर्मचारी विशाल पिलावरे आणि दीपक पिलावरे तसेच स्थानिक नागरिक शंकर रसाळ, आकाश जाधव आणि लहू खरात मदतीसाठी धावून आले. महावितरण विभागाच्या कर्मचा-यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. संबंधितांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने जिज्ञेश यांना किल्ल्याच्या पायथ्याशी आणले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
















