नवी दिल्ली : बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांना सीमेपार त्यांच्या देशात पाठवण्याची भारतीय सैन्याची मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे. नुकतीच दिल्लीतून ३८ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही महिला आणि लहान मुले यांचा देखील समावेश आहे.
दिल्लीमध्ये संसार थाटण्यापूर्वी या लोकांनी बिहार आणि नुहमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला होता. या लोकांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती देताना अधिका-यांनी सांगितले की, सध्या ताब्यात घेतलेले घुसखोर आधी हरियाणाच्या नुहमध्ये आणि नंतर बिहारमध्ये देखील गेले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले. या लोकांनी सुरुवातीला बिहारमध्ये मुक्काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या भागांमध्ये त्यांना आपला जम बसवता आला नाही. या ठिकाणी काहीच काम न मिळाल्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथल्या करखान्यांमध्ये काम करू लागले. इतकंच नाही तर, तिथेच झोपडी वजा घरे बांधून अवैधरित्या राहू लागले.
महिला, मुलांचा समावेश
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये काही लहान मुले आणि महिला देखील सामील आहेत. सगळ्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेली होती. या लोकांकडे आवश्यक कागदपत्रे देखील नव्हती.
शेकडो लोकांना मायदेशी धाडले
बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत शेकडो बांगलादेशी पकडले गेले आहेत. अनेकांना बांगलादेशला परत पाठवण्यात आले आहे. या लोकांच्या अटकेमुळे घुसखोरांना बनावट आधार कार्डसह विविध प्रकारची कागदपत्रे पुरवणारे अनेक नेटवर्क उघड झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्य दलाची ही मोहीम आणखी तीव्र झाली आहे.