24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
Homeराष्ट्रीयदेशात कोरोनाचे ४ नवे व्हेरिएंट

देशात कोरोनाचे ४ नवे व्हेरिएंट

चिंतादायक... आरोग्य विभागाची माहिती सद्यस्थितीत १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण

नवी दिल्ली : कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या भारतात १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत आणि एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांतील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर भारतातही या विषाणूचे नवे उपप्रकार झपाट्याने पसरत आहेत.

जेएन.१, एनबी.१.८.१, एलएफ.७ आणि एक्सएफजी हे ओमिक्रॉनचे उपप्रकार असून त्यांचा संसर्ग वेगाने होत आहे. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राजस्थानमध्ये गुरुवारी १५ नवे रुग्ण सापडले असून त्यापैकी ९ रुग्ण जयपूरमध्ये आढळले. उर्वरित प्रकरणे जोधपूर (२) आणि उदयपूर (४) येथे नोंदवली गेली. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तपासलेल्या नमुन्यांमधून एक्सएफजी आणि एलएफ.७.९ प्रकारांची उपस्थिती निष्पन्न झाली आहे.

हे प्रकार सध्या प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतात आढळून येत आहेत. कर्नाटकातील एका ७० वर्षीय व्यक्तीचा एन्सेफॅलोपॅथी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला, तर चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी राज्यांना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि उच्च जोखमीच्या गटासाठी बूस्टर डोस देणे यावर भर दिला आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण नोंदवले जात असून, गुरुवारी राज्यात ७६ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. राज्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ५९७ रुग्ण आढळले असून, सध्या ४२५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६५ रुग्ण बरे झाले असून, सात मृत्यू झाले आहेत. मृत्यू पावलेल्यांपैकी ६ जणांना इतर गंभीर आजार होते. मुंबईत २७, पुण्यात २१, ठाणे महानगरपालिकेत १२, कल्याणमध्ये ८, नवी मुंबईत ४, कोल्हापूर आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी १ तर रायगड जिल्ह्यात २ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतच एकूण ३७९ रुग्ण नोंदले गेले आहेत.

प्रशासनाने अलर्ट राहा : मंत्री जाधव
राज्यासह देशात काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग, आयुष विभाग यासाठी तयार आहे. लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने मोठे काम केले आहे. आरोग्य विभागाने सर्व राज्याचे आरोग्यमंत्री, सचिव यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळी होऊ नये, यासाठी आमचं विभाग पूर्ण तयार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी कोणी खोटे औषध विकत असेल तर त्यावर आम्ही आणि आमचा विभाग लक्ष ठेवून कारवाई करू, अशी माहिती ही मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR