परभणी : पेपर फुटीचे प्रकरण उघड झाल्यानंतर यापुर्वी घेतलेली निट परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही रद्द झालेली अर्थात नीट पुनर्परीक्षा रविवार, दि.२१ जून रोजी शहरातील १४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. ४ हजार ७५१ परीक्षार्थीपैकी ४३७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३८१ विद्यार्थी गैरहजर होते. या सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. यावेळी खबरदारी म्हणून परीक्षा केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कर्मचा-यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात येत होते.
राष्ट्रीय चाचणी संस्थाद्वारे (एनटीए) शहरातील १४ परीक्षा केंद्रांवर पुनर्निट परीक्षा सुरू होती. यात ज्ञानोपासक महाविद्यालय, शिवाजी ज्युनियर कॉलेज, जिजाऊ ज्ञानतीर्थ ज्युनियर कॉलेज, कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, रावसाहेब जामकर उच्च माध्यमिक विद्यालय, बाल विद्यामंदिर मुख्य प्रशाला नानलपेठ, गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी, भारतीय बाल विद्यामंदिर प्रभावतीनगर, पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय कृषी विद्यापीठ परिसर, संत तुकाराम महाविद्यालय, सारंग स्वामी विद्यालय विवेकनगर, शारदा माध्यमिक विद्यालय, शारदा महाविद्यालय, शिवाजी लॉ कॉलेज वसमतरोड या केंद्रावर ४ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या परीक्षेच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्वच केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुनर्निट परीक्षेसाठी नियुक्त कर्मचा-यांकडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडताना कसून तपासणी करण्यात येत होती. यावेळी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक देखील उपस्थित असल्याने सर्वच केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
















