टोकियो : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जपानमध्ये आलेल्या ७.६ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत सुमारे ४८ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली मोठ्या संख्येने लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जपानमध्ये २४ तासांत १५० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे सर्वत्र विध्वंसाचे दृश्य पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनाने या मृत्यूंना दुजोरा दिला आहे. सोमवारी, जपानमध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर प्रशासनाने सुनामीचा इशारा जारी केला आणि लोकांना किनारी भाग रिकामा करण्यास सांगितले होते. मात्र, हा इशारा मंगळवारी सकाळी अॅडव्हायझरीमध्ये बदलण्यात आला आहे.
भूकंपानंतर लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असून १ हजाराहून अधिक बचाव कर्मचारी या कामात गुंतले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटले की भूकंपप्रवण लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांच्यापर्यंत मदत लवकरच पोहचेल. रस्ते खराब झाल्यामुळे भूकंपग्रस्त भागात पोहोचण्यासाठी स्वसंरक्षण दलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढले पाहिजे जेणेकरून इमारत कोसळण्यापूर्वी त्यांना बाहेर काढता येईल, असे ते म्हणाले.
“इशिकावा प्रांतातील किनारी नोटो भागातील रहिवाशांना “ताबडतोब उंचवटा असणाऱ्या भागात जाण्यास सांगितले गेले आहे. जपानच्या हवामान विभागाने ‘या भागातील लाटा ५ मीटरपर्यंत पोहोचू शकतात,’ असा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी शेजारच्या निगाटा आणि तोयामा प्रांतांसाठी देखील त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. २०११ मध्येही जपानमध्ये जोरदार भूकंप झाला होता. यानंतर त्सुनामी येऊन खूप नुकसान झाले होते. यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला होता. २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानचा अणु प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.