हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये आज (मंगळवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. मंगलौरच्या लहाबोली गावाजवळील माजरा मार्गावर असलेल्या वीटभट्टीची भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोतवाली मंगलौर परिसरातील लहाबोली गावात शानवी ब्रिक्स फील्ड नावाची वीटभट्टी आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मजूर एकत्र आगीजवळ बसून शेकत होते . जवळच एक कच्च्या विटांची भिंत होती जी अचानक कोसळली. त्यात सर्व कामगार गाडले गेले.
यात विटा वाहून नेणा-या काही जनावरांचाही मृत्यू झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून कामगारांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला होता. एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) प्रमेंद्र डोभाल यांच्यासह पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मंगलौर पोलिस स्टेशन अंतर्गत लहाबोली गावात वीटभट्टीची भिंत कोसळल्याची माहिती आम्हाला सकाळी ८. ३० च्या सुमारास मिळाली. किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसएसपी प्रमेंद्र डोभाल घटनास्थळी आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे जिल्हा पोलिस पीआरओंनी सांगितले.