नागपूर : महाराष्ट्रात ८५ ते १२५ च्या दरम्यान डेटा सेंटर आहेत. अदानी-अंबानींना यासाठी फुकटात जमिनी देण्यात आल्या आहेत. या डेटा सेंटरसाठी लाखो लिटर पाण्याची गरज असते. आमचा डेटा सेंटरला विरोध नाही, मात्र सर्वसामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागेल. हे मोठ्या लोकांचे चोचले आता बंद झाले पाहिजेत. देशातील ६० टक्के डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर सरकारने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे आणि नवीन डेटा सेंटरवर बंदी आणावी, ही गोष्ट आम्ही सरकारच्या लक्षात आणून देणार आहोत असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात जंगलतोडीचे काम जोरात सुरू आहे. भीमाशंकर परिसरातील जंगलावर घाला घातल्यानंतर आता रायगडमधील जंगलांवरही संकट आले आहे. १५०० मेगावॅट क्षमतेच्या अदानी यांच्या प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार झाडे तोडली जाणार आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि विश्वस्तांना विश्वासात न घेता प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राची नैसर्गिक ढाल आहे. येथील जंगलामुळे पर्यावरणीय संतुलन टिकून आहे. वन्यजीवांचे अधिवास नष्ट करून नेमके काय साध्य करायचे आहे? उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती नष्ट करू नका.
मोठ्या प्रमाणात टँकर सुरू
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला असून येत्या काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी कधीही या वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर सुरू झाले नव्हते, पण आता राज्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू करावे लागत आहेत.
बांधकामासाठी पाणी कुठून येणार?
महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ऑक्टोबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल २२ लाख चौरस फूट बांधकामाला परवानगी देण्यात आल्याची बाब गंभीर आहे. एवढ्या मोठ्या बांधकामासाठी पाणी कुठून आणणार, याचा विचार संबंधित आयुक्त आणि अधिका-यांनी केला आहे का? या परवानग्या शासनाच्या मान्यतेने देण्यात आल्या आहेत की अधिका-यांनी आर्थिक व्यवहार करून दिल्या आहेत? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून परवानग्या रद्द कराव्यात. पाण्याची उपलब्धता नसताना बांधकामांना परवानगी देणे म्हणजे भविष्यातील पाणीटंचाईला आमंत्रण देणे आहे.
आ. गायकवाडांच्या हेटाळणीला सरकार सहमत असेल
विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतक-यांच्या आत्महत्या होत असताना त्यांची हेटाळणी करणे हा अपमान आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अशी वक्तव्य केल्यावरही त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या भूमिकेशी सहमत आहेत का? वारंवार अशी विधान करणा-या गायकवाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे. अशा बेजबाबदार वक्तव्यांवर कारवाई झाली नाही तर डिसेंबरच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित करून कारवाईची मागणी करू.
















