नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या पाच वर्षांत भारतातील ६५ विमानांचे इंजिन टेकऑफ किंवा हवेत असताना बंद पडले. याचा अर्थ दर महिन्याला किमान एक विमान इंजिन बंद पडते. तथापि, सर्व प्रकरणांमध्ये, वैमानिक एकाच इंजिनवर विमान उतरवू शकले आणि जवळच्या विमानतळावर पोहोचू शकले.
माहितीच्या अधिकाराखाली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून ही माहिती मिळाली आहे. खरे तर, अहमदाबाद अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे हा अपघात झाल्याचे उघड झाले होते. त्याच वेळी आरटीआय अहवालात असेही उघड झाले आहे की, १ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२५ या १७ महिन्यांत ११ विमानांमधून ‘मेडे’ कॉल आले होते. यामध्ये तांत्रिक बिघाडाची माहिती देऊन आपत्कालीन लँडिंगची मागणी करण्यात आली होती. यापैकी चार विमाने हैदराबादमध्ये उतरली.
आरटीआय अहवालात १२ जून रोजी क्रॅश झालेल्या बोइंग ड्रीमलायनर आणि १९ जून रोजी इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचा समावेश नाही. कमी इंधनामुळे इंडिगोचे विमान वळवण्यात आले.
फ्रेंच शब्दापासून बनला ‘मेडे’
‘मेडे’ हा शब्द फ्रेंच शब्द ‘एम’एडर’ पासून आला आहे. त्याचा अर्थ ‘मला वाचवा’ असा होतो. ‘मेडे’ कॉल सहसा रेडिओद्वारे ‘एटीसी’ किंवा जवळच्या इतर विमानांना पाठवला जातो. या सिग्नलचा वापर तत्काळ मदत मागण्यासाठी केला जातो, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता येईल.

