दार्जिलिंग : मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील जनजीवन विस्कळीत झाले असून दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे भूस्खलनामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिरिक आणि कुर्सियांगला जोडणारा दुदिया आयर्न ब्रिज कोसळला असून सिलीगुडी-दार्जिलिंग राज्य महामार्ग-१२ वर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ११० वरील हुसैन खोला येथेही भूस्खलनामुळे सिलीगुडी आणि दार्जिलिंगमधील संपर्क तुटला आहे. मलब्यामुळे रस्ते बंद झाले असून प्रशासनाने आपत्कालीन सेवांसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब केला आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे, परंतु सततचा पाऊस आणि निसरड्या रस्त्यांमुळे अडथळे येत आहेत. प्रशासनाने लोकांना डोंगराळ मार्ग आणि नदीकाठांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. राजगंजमधील पोराझार येथे महानंदा नदीवरील बंधारा तुटल्याने अनेक घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहे यामुळे रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे.दरम्यान, झारखंडचा पश्चिमेकडूल भाग, दक्षिण बिहार आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशातही पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुर्शिदाबाद, बीरभूम आणि नदिया जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज आहे. बांकुरा येथे २४ तासांत ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली. प्रशासनाने शाळा बंद ठेवल्या असून खालच्या भागांत अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान विभागाचा रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने दार्जिलिंग, कलिम्पोग, कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तीस्ता आणि माल नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून मालबाजार आणि डुआर्समध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पर्यटन स्थळांचे नुकसान
मिरिक आणि कुर्सियांगसारख्या पर्यटन स्थळांना मोठा फटका बसला आहे. गावांमधील घरे मलब्याखाली गाडली गेली असून रस्त्यांवर चिखल आणि दगडांचा खच पडला आहे. प्रशासनाने अनेक गावे रिकामी करून लोकांना तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये हलवले आहे.
शुभेंदु अधिकारी यांचे आवाहन
पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी एक्सवर म्हटले आहे की, दार्जिलिंग, कालिम्पॉंग आणि कुर्सियांगमधील डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. भूस्खलन आणि पुरामुळे सिलीगुडी, तराई आणि डुआर्समधील संपर्क तुटला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे तातडीने मदत पथके आणि रस्ते पुनर्बांधणीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

