27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeसोलापूरआंतरजिल्हा बदलीतून सोलापुरात ८३ शिक्षक

आंतरजिल्हा बदलीतून सोलापुरात ८३ शिक्षक

सोलापूर : आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात आलेले काही शिक्षक घराजवळील शाळांमध्ये नेमणूक मिळावी म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आंतरजिल्हा बदलीतून ८३ शिक्षक सोलापूर जिल्ह्यात आले असून, सोलापूर जिल्हा परिषदेकडील ३४ शिक्षक त्यांच्या- त्यांच्या जिल्ह्यात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्यातच नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी काही दिवसांत नोंदणीकृत भावी शिक्षकांकडून ‘पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. तत्पूर्वी, आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात दाखल शिक्षकांना नेमणुका दिल्या जाणार आहेत. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, अक्कलकोट या सीमावर्ती तालुक्यांमधील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे.

त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना संबंधित रिक्त जागांवर नेमणुका मिळणार आहेत. त्यादृष्टीने प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू केली आहे. पण, काही शिक्षकांनी ओळखीच्या अधिकाऱ्यांमार्फत तर काहींनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जवळील तालुक्यांमध्येच नेमणूक मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, माध्यमिक शिक्षण विभागातही अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी असे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक शिक्षकाची नियुक्ती नियमानुसारच होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मागासवर्गीय कक्षाकडून तपासलेल्या बिंदुनामावलीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या मराठी (६२०) व उर्दू (५८) माध्यमाच्या शाळांमध्ये ६७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, आता आंतरजिल्हा बदलीतून ८३ शिक्षक सोलापूर जिल्ह्यात आले, पण आपल्याकडून ३४ शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. त्यामुळे ४९ शिक्षकांची पदे कमी होऊन उर्वरित ६२९ शिक्षकांचीच भरती होणार आहे. त्यातही शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार ३० टक्के पदे रिक्त ठेवली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून साधारणतः ४६४ शिक्षक मिळतील.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR