यवतमाळ : शेतक-यांचा कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात यवतमाळच्या महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बच्चू कडू सातबारा कोरा यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप यवतमाळ इथे झाला. यानिमित्ताने सभा झाली. या सभेचे स्थळ अचानक बदलल्याने बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातबारा कोरा यात्रेची समारोप सभा नियोजित ठिकाणी न घेता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घेण्यात आली. विना परवानगी महामार्गावर सभा घेतल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा समारोप अंबोडा इथे गजानन महाराज मंदिरात होणार होता.
यावेळी सभेला पाच ते सात हजार शेतक-यांचा जनसमुदाय होता. शिवाय ३० ते ४० ट्रॅक्टर होते. खडका ते अंबोडा पर्यंत दोन्ही बाजूनी मोर्चा चालत होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ऐनवेळी सभेचे ठिकाण आयोजकांनी बच्चू कडू यांनी बदलले. राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली.
यामुळे आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता राष्ट्रीय महामार्गावर सभा घेतल्याप्रकरणी बच्चू कडूसह गणेश ठाकरे, आकाश पावडे, रामेश्वर कदम, सचिन राऊत, बंडू वाघमारे, सुनील पावडे, सदानंद राऊत, पप्पू करपे, शेख रियाज, योगेश तायडे, शुभम खेडे (सर्व रा. अंबोडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यालाच संविधान म्हणायचे का?
आमच्या सभेने रस्ता ब्लॉक झाला. पण त्याच दिवशी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सभा व्यवस्थित झाली पाहिजे, यासाठी चार ते पाच रस्ते पोलिसांनी ब्लॉक केले. सरकारला हे चालते. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसाठी वेगळे कायदे आणि सामान्य नागरिक शेतकरी गर्दी करतात, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता, यालाच संविधान म्हणायचे का? आमच्यावर गुन्हे दाखल झाले, याची आम्हाला पर्वा नाही असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले.