30.7 C
Latur
Saturday, July 19, 2025
Homeराष्ट्रीयमोदींच्या शिवाय भाजप १५० जागा जिंकू शकत नाही : दुबे

मोदींच्या शिवाय भाजप १५० जागा जिंकू शकत नाही : दुबे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज पंतप्रधान मोदींना भाजपची गरज नाही, तर भाजपला मोदींची गरज आहे. २०२९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढणे, ही भाजपची मजबुरी आहे, मोदींशिवाय भाजप लोकसभेच्या १५० जागा देखील जिंकू शकणार नाही, असे विधान भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी केले.

आता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि दिल्लीत जागा रिकामी नाही, असे विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या विधानाचा अर्थ काय आहे? या प्रश्नावर बोलताना खासदार दुबे म्हणाले, मला तर पुढील १५-२० वर्षापर्यंत मोदीजी नेते म्हणून दिसत आहेत, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चांबद्दल सूचक भाष्य केले.

खासदार निशिकांत दुबे म्हणाले, जर मोदीजी आमचे नेते नसतील, तर भाजप १५० जागाही जिंकू शकत नाही. २०२९ ची निवडणूकही भाजपची मजबुरी आहे की, मोदीजींच्या नेतृत्वाखालीच लढावी लागेल, असे विधान दुबेंनी भाजपच्या नेतृत्वाबद्दल केले.

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवृत्तीबद्दल एक विधान केले होते. ७५व्या वर्षी सत्काराची शाल खांद्यावर पडली की, निवृत्त व्हा असे समजून जावे, अशा आशयाचे विधान सरसंघचालकांनी केले होते.

मोहन भागवत यांच्या विधानाबद्दल निशिकांत दुबे यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, आज मोदींना भाजपची गरज नाही, आज भाजपला मोदींची गरज आहे. यावर सहमत असाल किंवा नसाल, हा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष व्यक्ती चेह-यावर चालतो, असे निशिकांत दुबे मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्यावर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR