साडेचार तास एकाच हॉटेलात, चर्चा झाल्याची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे तब्बल साडेचार तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते. त्यामध्ये अर्धा ते एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची चर्चा सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ््या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले. हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते.
नेत्यांची गुप्त बैठक
सोफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी हा एरिया बंद करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली. याची माहिती मात्र मिळू शकली नाही.