बीड : प्रतिनिधी
बीड जिल्हा कारागृह सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहे. वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या कारागृहाची राज्यभरात चर्चा रंगली होती. तसेच कराड गँग आणि गिते गँग यांच्यात तुरुंगातच गँगवॉर झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता याच बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करत आहे, याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपांमुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आले होते. आता त्याच कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडला आहे. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलिस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना बराक क्रमांक ७ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडची हालचाल संशयास्पद वाटली.