पावसाची दडी, कोवळी पिके माना टाकू लागली, दिवसभर कोरडे ढग, शेतकरी चिंताग्रस्त
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. यातून आता खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या चार दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला. परंतु मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत बहुतांशी ठिकाणी पाऊसच गायब असल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाअभावी पिके करपत असून, पिकांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाअभावी मराठवाड्यातील बहुतांश भागांत कोवळी पिके सुकत आहेत. लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. हिंगोली जिल्ह्यात पंच्याऐंशी टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यासोबतच बीड, लातूरममध्येही तुरळक ठिकाणी साधारण पाऊस झाला. परभणी, नांदेड, हिंगोलीमध्येही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु या पावसाने पिकाला आधार मिळालेला नाही. त्यामुळे हलक्या, सर्वसाधारण शेत जमिनीवरील पिके हातातून जाण्याच्या अवस्थेत आहेत. कारण दुपारच्या उन्हात पिके माना टाकत असून, पाऊस नसल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने धाराशिव, लातूर जिल्ह्यात खरीप पिकांवर संक्रांत आली आहे. शेतक-यांनी कोळपणी, पेरणीसाठी प्रचंड खर्च केला. महाग बियाणे, खत, किटकनाशक, फवारणी यासाठी मोठा खर्च करूनही सोयाबीन आणि इतर खरीप पिके पदरात पडणार का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आधीच महागाई त्यात शेतीतून उत्पन्न हाती न लागल्यास खर्च कसा भरून काढायचा याची चिंता शेतक-यांना भेडसावत आहे. यासोबतच पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचीही समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांसह सर्वांचेच लक्ष ढगाकडे लागले आहे. परंतु आकाशात कोरडे ढगच जमा होत आहेत.
लवकर पाऊस न झाल्यास
पिके करपण्याचा धोका
मराठवाड्यात महिनाभरापासून पाऊस गायब आहे. अवकाळी पाऊस आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतक-यांनी लगबगीने शेतजमिनी दुरुस्त करून पेरणी उरकली. परंतु पेरणी झाल्यापासून मराठवाड्यातून पाऊस गायब झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु ब-याच भागाला पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पिके सुकली असून, दुपारच्या वेळी माना टाकत आहेत. त्यामुळे लवकर पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आकाशात कोरडे ढग
आकाशात दिवसभर आणि रात्रीही ढग भरून येतात. परंतु ते बरसत नाहीत आणि सध्या पाऊस येण्यासारखे वातावरण नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. महाग बियाणे आणि खते खरेदी करून पेरणी केली खरी. परंतु आता पाऊसच नसल्याने चिंता वाढली आहे.