मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी मंत्री केले. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले. मग आम्ही चूक केली असे म्हणणार का? त्यामुळे त्यांनी शिवसेनाफुटीचे खापर माझ्या डोक्यावर फोडू नये, असे बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी व धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या तिकिटावर विधान परिषदेवर जाणा-या बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. बच्चू कडूला घरी बोलावून मंत्री केले ही माझी चूक झाली. तो जुना शिवसैनिकच होता. पण लोभापायी गेला त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले.
बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात मला राज्यमंत्रिपद दिले. माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले. एकनाथ शिंदेंनीच माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून दिली होती. मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आमच्या मतांमुळेच ते मुख्यमंत्री झाले. त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला संख्याबळासाठी गळ घातली होती. ठाकरेंनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले नाही. त्यांनी माझ्याऐवजी गडाखांना ते दिले.
















