जळगाव : प्रतिनिधी
प्रताप पाटील आणि सुमित हे दोघे जण आमच्या पक्षात इच्छुक आहेत. पण सुमितचे वय कमी असल्याने प्रताप पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली, असे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र यावर निर्णय हा वरच्या स्तरावर होणार आहे. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. विधान परिषदेच्या ७ जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. आता ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात ते पहावे लागेल. योग्य निर्णय होईल.
दोघांनाही एकमेकांची गरज
गुलाबराव पाटील म्हणाले की, विधान परिषदेच्या जागेबद्दल अजून निर्णय झालेला नाही. जर आमच्या पक्षाला जागा सुटली तरी आम्हाला भाजपची गरज आहे आणि जागा भाजपला सुटली तरी भाजपला आमची गरज आहे. त्यामुळे उमेदवार देतानासुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार उमेदवार देऊ. महायुतीचा उमेदवार कसा विजयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही अर्ज भरू पण महायुतीचे नेते जे फायनल करतील तोच निर्णय अंतिम राहील.
















