मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सध्या देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. त्याचबरोबर यावरून सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांकडूनही राजकारण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. आता भाजप श्रीरामालाच निवडणुकीसाठी उमेदवारी देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरील चर्चेवर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, रामाच्या नावाने इतके राजकारण सुरू आहे की, आता फक्त एकच गोष्ट शिल्लक राहिली आहे ती म्हणजे भाजप २२ जानेवारीला निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून श्रीरामाच्या नावाचीच घोषणा करेल.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण देण्यात आलेले नाही. हा भाजपच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती तर भाजपवाल्यांनी हात वर केले होते, असा आरोपही संजय राऊत सातत्याने भाजपवर करत आहेत.